मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडून हे ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याचं सांगितलं जातं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा आहे. ६ खासदारांच्या फुटीच्या चर्चेनंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून सर्व खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही या सहा खासदारांपैकी एकही खासदार पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे हे ६ खासदार फुटल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.
असं असलं तरी अद्याप या ६ खासदारांनी अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे या खासदारांच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, या सहा खासदारांपैकी एक असलेले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची आता पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा एक व्हिडीओ समोर आला असून त्या व्हिडीओमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचं कारण सांगितलं आहे.
‘सत्तेशिवाय कुठलीही कामे होत नाहीत. विकासकामे होत नसल्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर आपण अजिबात नाराज नाही’, अशी प्रतिक्रिया खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली. तसेच ‘आपण १८ तारखेपर्यंत कुठेही गेलो नव्हतो. मात्र, ज्या पद्धतीने अविश्वास दाखवला गेला, बोलण्याचा अतिरेक झाला, त्यानतंर बऱ्याच मंडळींनी विचार केला की आता इथे (ठाकरे सेनेत) थांबून उपयोग नाही’, असंही आष्टीकर यांनी म्हटलं आहे.
नागेश पाटील आष्टीकर काय म्हणाले?
“सर्वांना जय महाराष्ट्र, गेल्या दोन ते तीन दिवसानंतर पहिल्यांदाच मी आपल्या सर्वांसमोर संवाद साधत आहे. काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सर्वात आधी मी हे स्पष्ट करतो की मी कोणावरही नाराज नाही. उद्धव ठाकरे यांच्यावरही मी नाराज नाही. उद्धव ठाकरे यांनी मला खूप प्रेम दिलं. संजय राऊत किंवा आणखी कोणी बोलत असेल तर त्यांचाही माझ्यावर हक्क आहे. त्यामुळे ते माझ्याविरोधात बोलले तरी मला वाईट वाटणार नाही. १८ तारखेपर्यंत आम्ही कोणीही कुठेच गेलेलो नव्हतो. मात्र, ज्या पद्धतीने अविश्वास दाखवला गेला किंवा बोलण्याचा अतिरेख झाला, त्यामुळे बऱ्याच मंडळींनी असा विचार केला की आता इथे (ठाकरे सेनेत) थांबून काही उपयोग होणार नाही”, असं नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलं आहे.
,,,म्हणून हे पाऊल उचललं’ : नागेश पाटील आष्टीकर
“आपण पाहतो की सत्तेशिवाय कोणतेही कामे होत नाहीत. त्यामुळे मी हे पाऊल उचललं आहे. माझ्या मतदारसंघात विकासकामे करावे लागतील, लोकांनी मला खूप मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेलं आहे. त्यामुळे मला लोकांची कामे करणं क्रमप्राप्त आहे. तुम्हालाही माहिती आहे की कोणताही निधी मिळत नाही. पण प्रत्येक गावात गेलं की प्रत्येकाला विकासकामांच्या अपेक्षा असतात. कारण सर्वांनीच मला खूप अपेक्षेने खासदार म्हणून निवडून दिलं आहे. मग मी विकासकामे कसे करायची? त्या विकासकामांसाठी निधी कुठून आणायचा? पंचायत समित्या असतील किंवा नगरपालिका किंवा आणखी काही, कोणाचेही कामे होत नव्हते. त्यामुळे जर आपल्याला विकास करायचा असेल, निधी आणायचा असेल तर सत्तेत जाणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मी हे पाऊल उचललं आहे. माझ्यावर मतदारांनी जी जबाबदारी टाकलेली आहे ती मी पार पाडण्याचं काम करेन”, असं नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलं आहे.